
रायगड, 02 जानेवारी (हिं.स.)। अलिबाग शहरात उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एस.टी. डेपो येथील गणपती मंदिर परिसरात यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरामध्ये एस.टी. डेपोतील सुमारे १०० कर्मचाऱ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी तसेच इतर सर्वसाधारण आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार कर्मचाऱ्यांना मोफत औषधोपचार व आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. दैनंदिन कामाच्या ताणतणावात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या उपक्रमासाठी उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना, पिंपळभाट येथील डॉ. मंजिरी पाटील यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्यासोबत सिस्टर रुचिता कदम व अंकुश चंदनशिव यांनीही सहकार्य केले. वैद्यकीय पथकाने अत्यंत संयमाने व आपुलकीने तपासणी करून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला.शिबिराच्या वेळी आगार व्यवस्थापक राकेश देवरे, प्रभारक शिवराज जाधव तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रमोद अनमाने यांनी उपस्थित राहून आयोजक संस्थांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके