
रायगड, 02 जानेवारी (हिं.स.)। कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा लवकर शोध लागून नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने रायगड जिल्ह्यात दि. १ जानेवारी ते दि. ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत कॅन्सर तपासणीसाठी विशेष व्हॅनद्वारे मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी केले आहे.
उपसंचालक, आरोग्य सेवा, ठाणे यांच्या स्तरावरून रायगड जिल्ह्यासाठी कॅन्सर तपासणी व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असून ठरविण्यात आलेल्या ए.टी.पी.नुसार ही मोहीम विविध गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत थळ, वाघोली, कोर्लई, तळा, दिघी, नेरूळ, पाभरे, कापडे, टोल, वरंध, निजामपूर, साई, धाटाव, रोहा, जांभूळपाडा, आरव, आमटेम, अंजप, कर्जत, वडवळ, होनाड, आजीवली, जासई, पोयंजे आदी गावांमध्ये कॅन्सर तपासणी केली जाणार आहे.
या कॅन्सर व्हॅनसोबत एक स्त्रीरोगतज्ज्ञ, एक दंत शल्यचिकित्सक तसेच एक सहाय्यक परिचारिका उपस्थित राहणार असून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. दररोज किमान १५० नागरिकांची कॅन्सर तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी, कॅन्सरबाबत जनजागृती वाढावी तसेच नागरिकांनी वेळेत तपासणी करून घ्यावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधीपरिचारिका व सहाय्यक परिचारिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके