
सातारा, 02 जानेवारी, (हिं.स.)। : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थाने, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, पॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत. या प्रक्रल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१४ ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प केला होता. यासाठी पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला प्राधिकृत केले. त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली. जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. पोलीस कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण करुन त्यांना राहण्यायोग्य घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली. पोलिसांच्या मुलांना व त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेकवेळा तासंतास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावे, यादृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरीगोसावी, विलास बिरारी यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करुन प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले. यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर