
लातूर, 2 जानेवारी, (हिं.स.)। वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ पोलिस यंत्रणेवर अवलंबून न राहता, औसा तालुक्यातील कवळी गावाने लोकसहभागातून आपली सुरक्षा यंत्रणा स्वतःच उभी केली आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याला आता आपले आधार कार्ड ग्रामपंचायतीकडे जमा केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. आतापर्यंत तब्बल ७० फेरीवाल्यांचे आधार रेकॉर्ड ग्रामपंचायतीने संकलित केले असून, या कडक नियमांमुळे गावात गेल्या वर्षभरापासून लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण शून्यावर आले आहे.
शेजारील गावात दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्यानंतर कवळी ग्रामपंचायत सतर्क झाली. सरपंच राहिबाई जगताप आणि उपसरपंच सुनीता जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावाने सुरक्षेचे कडेकोट नियोजन केले आहे. ग्राम्प्रवेशद्वार, शाळा आणि मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून, संपूर्ण गाव रात्रीच्या वेळी एलईडी व सौर दिव्यांनी उजळून निघते. पारदर्शक कारभारासाठी तक्रार पेटीचाही आधार घेतला जात आहे. गावच्या या विकास प्रवासात सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती आणि ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis