परभणीकरांसाठी मोठी भेट, उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन–१ व डी-प्लस श्रेणी मंजूर
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)। परभणी जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय पालकमं
परभणीकरांसाठी मोठी भेट, उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन–१ व डी-प्लस श्रेणी मंजूर


परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे.

नवीन धोरणानुसार परभणी जिल्ह्याचा समावेश “झोन–१” मध्ये करण्यात आला आहे. नवीन धोरणांतर्गत झोन–१ मध्ये देशाच्या सरासरीपेक्षा कमी प्रतिव्यक्ती उत्पन्न असलेले जिल्हे समाविष्ट केलेले आहेत. झोन–१ मध्ये समावेश झाल्यामुळे परभणीतील गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत.

तसेच परभणी जिल्हा “डी-प्लस (D+) श्रेणी” मध्ये कायम ठेवण्यात आला असून, या झोनमध्ये राज्यातील सर्वाधिक औद्योगिक प्रोत्साहन सवलती दिल्या जातात.

या निर्णयामुळे नवीन उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक मागासलेपणाचा विचार करून मुख्यमंत्री महोदयांकडे परभणीसाठी विशेष झोन दर्जाची मागणी केली होती. सदर मागणी मंजूर होऊन राज्याच्या औद्योगिक धोरणात समाविष्ट करण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आभार मानले आहेत.

सदर निर्णयामुळे परभणी जिल्ह्यात उद्योग सुरू करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल अनुदाने, करसवलती, भांडवली सहाय्य व इतर प्रोत्साहनांचा लाभ मिळणार असून, जिल्हा आता राज्यातील गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande