बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेसाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक - पुणे जिल्हाधिकारी
पुणे, 2 जानेवारी (हिं.स.)। ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आ
बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेसाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक - पुणे जिल्हाधिकारी


पुणे, 2 जानेवारी (हिं.स.)। ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, ती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यातील विद्यार्थी स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय सेवा योजना – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणशास्त्र सभागृहात आयोजित जनजागृती व समन्वय नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. गणेश भामे, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अमित गोगावले, विभागीय समन्वयक व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, पुणे शहराचा सायकलिंगचा गौरवशाली इतिहास आहे. ही ओळख पुनरुज्जीवित करण्यासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पुण्यातील हजारो सायकलपटू विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत असून, येथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता आणि क्रीडा संस्कृती सायकलिंगसाठी अत्यंत अनुकूल आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या दृष्टीने सायकलपटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘टूर द फ्रान्स’च्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेमुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावण्यास मदत होणार असून, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्हा प्रशासन काम करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, एनसीसी, एनएसएस तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक आणि प्रेक्षक म्हणून सक्रिय सहभाग घ्यावा. यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करून ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले की, ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’च्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट करण्यात येत असून, हे रस्ते भविष्यात सायकलपटूंना उपयुक्त ठरणार आहेत. पुण्याला ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख निर्माण करण्याच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande