रत्नागिरी : चिपळूणला ५ जानेवारीपासून वाशिष्ठी कृषी महोत्सव
रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण येथे ५ जानेवारीपासून वाशिष्ठी कृषी महोत्सव होणार असून त्यामध्ये संगीत, भक्ती आणि शौर्याचा संगम दिसेल. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणारा आणि संपूर्ण कोकणात नावाजलेला वाशिष्ठी कृषी महोत्सव यंदाही नवचैत
रत्नागिरी : चिपळूणला ५ जानेवारीपासून वाशिष्ठी कृषी महोत्सव


रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण येथे ५ जानेवारीपासून वाशिष्ठी कृषी महोत्सव होणार असून त्यामध्ये संगीत, भक्ती आणि शौर्याचा संगम दिसेल.

सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येणारा आणि संपूर्ण कोकणात नावाजलेला वाशिष्ठी कृषी महोत्सव यंदाही नवचैतन्य, नवी ऊर्जा आणि अस्सल मराठी संस्कृतीचा दरवळ घेऊन चिपळूणमध्ये ५ ते ९ जानेवारी या काळात साजरा होणार आहे.

वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता विघ्नहर्ता ढोलपथक, मुकुंद गुरव यांचे तुतारीवादन आणि छत्रपती शिवाजी पेठ (कोल्हापूर) येथील गणेश कदम यांच्या मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. ढोल-तुतारीच्या गजरात तलवारबाजी, दाणपट्टा व भाल्याच्या खेळातून स्वराज्याचे शौर्य आणि मावळ्यांची गाथा साकारली जाणार आहे. ६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता जनावरांच्या गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ६ वाजता हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता कृष्णाई इव्हेंट प्रस्तुत ‘वारी’ या भक्तिरसाने ओथंबलेल्या कार्यक्रमातून संतपरंपरा, विठ्ठल नामस्मरण आणि अध्यात्माचा अनुभव रसिकांना मिळणार आहे. ७ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कॅट शो, सायंकाळी ६ वाजता कीर्तन आणि रात्री ८ वाजता ‘मावळा – स्वराज्याचे शिलेदार’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचे बलिदान, निष्ठा आणि शौर्य प्रभावीपणे उलगडले जाणार आहे. ८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता डॉग शो, सायंकाळी ६ वाजता भजन आणि रात्री ८ वाजता लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून, त्यांच्या बहारदार गाण्यांनी महोत्सवाचा परिसर दुमदुमून जाणार आहे. महोत्सवाचा समारोप ९ जानेवारी होणार असून रात्री ८ वाजता प्रसिद्ध संगीतकार अशोक हांडे यांच्या ‘आवारा हूँ’ हा लाइव्ह शो होईल. कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या संगीतमय जीवनप्रवासाचे हृदयस्पर्शी सादरीकरण या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.

कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि दर्जेदार मनोरंजन यांचा संगम असलेला वाशिष्ठी कृषी महोत्सव संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande