वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा - बी. वेणू गोपाल रेड्डी
छत्रपती संभाजीनगर, 02 जानेवारी (हिं.स.)। वेरूळ घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे विहित मुदतीत पूर्ण करा. या विकासात स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य द्या. तसेच स्थानिक रहिवाशांचा सहभाग विकास प्रक्रियेत घ्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र श
अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी


छत्रपती संभाजीनगर, 02 जानेवारी (हिं.स.)। वेरूळ घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे विहित मुदतीत पूर्ण करा. या विकासात स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य द्या. तसेच स्थानिक रहिवाशांचा सहभाग विकास प्रक्रियेत घ्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणू गोपाल रेड्डी यांनी वेरूळ येथे दिले.

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर व वेरूळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीपथावरील कामांची पाहणी श्री. रेड्डी यांनी केली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, भारतीय पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री रेड्डी यांनी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. घृष्णेश्वर मंदिर परिसर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मार्गिका, प्रगतीपथावर असलेले विश्रामगृह, सुविधा केंद्र आदी विविध कामांची पाहणी त्यांनी केली.

त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सूचना केल्या की, तीर्थक्षेत्र विकास सुविधांची कामे करताना स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच त्यांच्या गरजांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. स्थानिक कारागिरांनी तयार केलेली उत्पादने तसेच कलावस्तू यांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या वस्तू व उत्पादने येणाऱ्या पर्यटकांना खरेदीसाठी उपलब्ध व्हाव्या. तसेच स्थानिक खाद्य संस्कृती, कला यांचेही सादरीकरण पर्यटकांना व्हावे. भाविकांसाठीचे पादचारी मार्ग, वाहनांचे पार्किंग तसेच शैक्षणिक सहलींचाही विचार या आराखड्यात करण्यात यावा. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यात यावा अशा सूचना श्री. रेड्डी यांनी यावेळी केल्या. या बैठकीस भारतीय पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वनविभाग अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande