
नागपूर, 02 जानेवारी (हिं.स.)। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व. भानुताई गडकरी मेमोरिअल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शुक्रवार, २ जानेवारी रोजी सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
अंकुर सिड्सच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन अंकुर सिड्सचे अध्यक्ष रवी काशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ना. श्री. नितीन गडकरी, सौ. कांचन गडकरी, अंकुर सिड्सचे व्यवस्थापकीय संचालक माधवराव शेंबेकर, संचालक मकरंद सावजी, दिलीप रोडी, विजयी भारत संस्थेचे सचिव प्रभाकर येवले आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांचा प्रमुख उपस्थिती लाभली.
डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन २७ जुलै २०२५ रोजी झाले असून, यानंतर गरीब कुटुंबातील रुग्णांना एमआरआय, सीटी स्कॅन, डायलिसीस, एक्स-रे, पॅथॉलॉजी, जनरिक औषध यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जवळपास दहा हजार रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे.यावर्षी सोनोग्राफी सुविधेची भर झाल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक चाचण्या कमी दरात रुग्णांना उपलब्ध होतील. या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत रवी काशीकर यांनी नितीन गडकरी यांच्या संकल्पनेला मान दिला आणि गरीब रुग्णांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.नितीन गडकरी यांनी अंकुर सिड्सच्या व्यवस्थापनाचे आभार मानले आणि यापुढे अधिकाधिक गरीब रुग्णांना या सुविधा लाभतील, अशी आशा व्यक्त केली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis