
वर्धा,2 जानेवारी (हिं.स.) । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी काढून डिजिटल नोंदणी करण्याचे आवाहन केले. हे मार्गदर्शन नुकतीच न्यू आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, वर्धा येथे आयोजित अपार आयडी आणि स्वयंसिद्धा जनजागृती बैठकीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. राजू हिवसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य व प्राचार्य डॉ. सचिन पोपटकर, डॉ. संजय धनवटे, डॉ. ससीनकर, तसेच विद्यापीठाच्या लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्ष डॉ. शालिनी लिहितकर आणि आयटी समन्वयक सतीश शेंडे उपस्थित होते.
बैठकीत वर्धा जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी सर्व विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी तसेच प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांची ‘स्त्री शक्ती पोर्टल’वर स्वयंसिद्धा नोंदणी करण्याबाबत सविस्तर माहिती दिली गेली.
डॉ. शालिनी लिहितकर यांनी ‘स्त्री शक्ती पोर्टल’वर स्वयंसिद्धा नोंदणी कशी करावी याची माहिती दिली. तसेच शासनाच्या स्वयंसिद्धा अभियानाबाबत विद्यार्थिनींसाठी उपलब्ध विविध योजनांची माहितीही उपस्थितांसमोर मांडली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची डिजिटल अपार आयडी तयार करणे आवश्यक आहे. याबाबत आयटी समन्वयक श्री सतीश शेंडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
वर्धा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधींनी बैठकीत सहभागी होऊन या उपक्रमास मान्यता दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis