
पालघर, 02 जानेवारी (हिं.स.) - येथील वसई पूर्व येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट हाईस्कूलच्या ३१ डिसेंबरच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी येशूच्या स्पर्शाने आंधळा बरा होणे, लंगडा चालणे आदी असाध्य आजार बरे करणारे चमत्कारांचे नाट्यमय प्रदर्शन केले. याविषयीचा सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. तसेच https://youtu.be/0Qp2Q7Yv7ik या व्हिडिओवरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. हिंदु जनजागृती समितीने यावर तात्काळ कारवाईसाठी वसई-विरार पोलीस उपायुक्त, माणिकपूर पीआय व परिमंडळ-२ उपायुक्त यांना प्रत्यक्ष निवेदन दिले आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या वेळी निवेदन देतांना समितीचे सर्वश्री विलास निकम, प्रशांत पाटील, अतुल मेहता, संदीप तुळसकर आणि जामकर हे उपस्थित होते.
या तक्रारीत म्हटले आहे की, हे अवैज्ञानिक प्रदर्शन महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३ अंतर्गत दंडनीय आहे, ज्यात तथाकथित चमत्कारांचा प्रचार समाविष्ट आहे. शाळेत अंधश्रद्धा पसरवून मुलांच्या कोवळ्या मनावर अवैज्ञानिक धारणा बिंबवल्या जातात, ज्यामुळे मानसिक विकास बाधित होतो व शैक्षणिक परिसरात खोटे चमत्कारांच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून येशूविषयी विद्यार्थ्यांमध्ये खोटी प्रतिमा निर्माण करून विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र उघडपणे दिसत आहे.
समितीने शाळा प्रशासनाची चौकशी, शिक्षण आणि मुख्याध्यापकांचे निलंबन, गुन्हा नोंद व सर्व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली आहे. श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदू मुलांच्या कोवळ्या मनावर खोटे चमत्कार बिंबवून धर्मांतराचे विघटनकारी षड्यंत्र चालवले जाते! शिक्षण हे विवेक जागृत करणारे असावे, चमत्कार, अंधश्रद्धेचे नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी