
ठाणे , 02 जानेवारी (हिं.स.)। शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या मा. विरोधीपक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून राष्ट्रवादी (श.प) च्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.
आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला. केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. तर, आपण अपक्ष असलो तरी स्व. मुकूंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ, असे प्रमिला केली यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर