
मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात समुदाय-आधारित आणि लिंग-संवेदनशील हवामान कृती आराखड्याचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या तीन वर्षांच्या उपक्रमातून हवामान प्रशासनात लिंग न्याय, आदिवासी ज्ञान आणि स्थानिक नेतृत्वाचा समावेश करण्यात येणार असून, हा मॉडेल राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
हा उपक्रम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिसंवादात जाहीर करण्यात आला. हे परिसंवाद ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’च्या पूर्वतयारीचा भाग होता. TISS च्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्ष, असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स, वातावरन फाउंडेशन आणि पॉलिसी अँड डेव्हलपमेंट अॅडव्हायजरी ग्रुप यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात असून, याला युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटो इंडिया फाउंडेशनचे समर्थन लाभले आहे.
राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा, गाव आणि ग्रामपंचायत पातळीवर हवामान नियोजन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असून, हा उपक्रम महाराष्ट्राच्या SAPCC 2.0 धोरणाशी सुसंगत राहणार आहे.
मुंबई क्लायमेट वीकचे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले की, हवामान कृती केवळ जागतिक परिषदांपुरती मर्यादित न राहता स्थानिक पातळीवर—विशेषतः महिला आणि आदिवासी समुदायांमधून—उभारी घेणे आवश्यक आहे. रायगडमधील हा उपक्रम त्याच दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. TISS चे प्रभारी कुलगुरू प्रा. एम. मरियप्पन यांनी महिलांच्या भूमिकेवर भर देत हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर समुदायाचा आवाज नियोजन प्रक्रियेत केंद्रस्थानी असणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
या परिसंवादात हवामान बदल हा केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न असल्याचे अधोरेखित करण्यात आले. महिला, आदिवासी आणि वंचित समुदायांवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याने सहभागी नियोजन आणि हवामान न्याय यांचा विकास आराखड्यांत समावेश करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणारा मुंबई क्लायमेट वीक हा केवळ तीन दिवसांचा कार्यक्रम नसून, कार्यशाळा, केस स्टडीज, चर्चासत्रे आणि पुढील उपक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणारा मंच ठरणार आहे. हा उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या नागरिक-केंद्रित स्वयंसेवी संस्थेने संकल्पित केला असून, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने राबवला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule