डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह नूतनीकरणात सुविधांना प्राधान्य द्यावे – आयुक्त
ठाणे, 20 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम करताना कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह नूतनीकरणात सुविधांना प्राधान्य द्यावे – आयुक्त


ठाणे, 20 जानेवारी (हिं.स.)।

ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम करताना कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. यासाठी नाट्यकलावंतांशी चर्चा करून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेश करावा, तसेच प्रेक्षकांच्या सोयीसुविधांचाही विचार करून कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून, या निधीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मंगळवारी (२० जानेवारी) आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, विनोद पवार, विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रेक्षागृहातील तातडीच्या दुरुस्ती कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. वॉटरप्रूफिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल कामे, प्रेक्षागृहातील लाईट फिटिंग, साउंड सिस्टिम, एअर कर्टन, वातानुकूलन व्यवस्था, स्टेज दुरुस्ती, रूफ गार्डन, व्हीआयपी कक्षातील पडदे बदलणे तसेच स्वच्छतागृहांच्या सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच ड्रेनेज लाईनची दुरुस्ती, रंगमंचावरील लाकडी लेव्हलचे नूतनीकरण, नाटकांच्या जाहिरातींसाठी असलेले फलक डिजिटल स्वरूपात करणे, नाट्यगृहाच्या मुख्य व इतर प्रवेशद्वारांची पाहणी करून आवश्यक बदल करणे आदी बाबींवरही बैठकीत चर्चा झाली. शासनाकडून प्राप्त झालेला निधी पूर्णतः नाट्यगृहाच्या दुरुस्ती व सुधारणा कामांसाठीच वापरण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande