अकोला : मग्रारोहयो अंतर्गत कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी
अकोला, 20 जानेवारी (हिं.स.) ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) ही महत्त्वाची संधी असून, विहित वेळेत गुणवत्ता पूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. शेतकऱ्यां
Photo


अकोला, 20 जानेवारी (हिं.स.)

ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) ही महत्त्वाची संधी असून, विहित वेळेत गुणवत्ता पूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मातोश्री पानंद रस्ते व मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेंतर्गत कामे आराखड्यानुसार प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मग्रारोहयोचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले. मजुरांच्या मजुरीची वेळेत अदा, कामांची अद्ययावत नोंद, आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी बाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नरेगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती व प्रसाधनगृहांची गुणवत्तापूर्ण बांधकामे करण्यावर भर देण्यात यावा. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी करावी. ग्रामसभांच्या माध्यमातून महत्त्वाच्या कामांचे आराखडे तयार केल्यास ग्रामविकासाला अधिक चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande