अमरावती मनपा स्वीकृत नगरसेवक संख्या झाली ९ : महापौर, उपमहापौर निवडीसह 15 फेब्रुवारीपूर्वी
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.) अमरावती महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून थेट ९ झाली आहे. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० सदस्य असा मनपा अधिनियमात सुधारणा केल्याने ही वाढ झाली आहे. हे स्वीकृत सदस्य महा
अमरावती मनपा स्वीकृत नगरसेवक संख्या झाली ९ : महापौर, उपमहापौर निवडीसह 15 फेब्रुवारीपूर्वी पहिल्या बैठकीत निवड


अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)

अमरावती महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून थेट ९ झाली आहे. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० सदस्य असा मनपा अधिनियमात सुधारणा केल्याने ही वाढ झाली आहे.

हे स्वीकृत सदस्य महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी होणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्या बैठकीत निवडले जातील. मतमोजणीच्या दिवसापासून साधारणतः महिनाभरात ही बैठक घेण्याचे निर्देश असल्याने, ती आगामी १५ फेब्रुवारीपूर्वी होण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीवेळी स्वीकृत नगरसेवकांची संख्या केवळ पाच होती. मात्र, २३ मार्च २०२३ रोजी शासनाने मनपा अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे हा बदल झाला आहे. या वाढीव सदस्यसंख्येचा फायदा पालिकेतील सर्वच राजकीय पक्ष आणि नवनिर्वाचित सदस्यांद्वारे स्थापन होणाऱ्या गटांना होणार आहे.

पहिल्या बैठकीचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. यात सर्वप्रथम महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होईल, त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल आणि शेवटी स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाईल.

अमरावती मनपाची लोकनिर्वाचित सदस्य संख्या ८७ आहे. या संख्येच्या दहा टक्के म्हणजे ८.७ सदस्य होतात. नियमानुसार, अपूर्णांकातील संख्या नजीकच्या पूर्णांकात गृहीत धरली जाते, त्यामुळे पालिकेत नऊ स्वीकृत नगरसेवक निवडले जातील.

स्थायी समितीचे १६ सदस्य निवडण्याचा विषय हा स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतरचा असतो. या निवडीसाठी मनपा सभागृहातील पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांनी स्थापन केलेल्या गटांतील सदस्यांची संख्या विचारात घेतली जाते. कायद्यानुसार, प्रत्येक गटाला त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप २५ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाकडे (वायएसपी) प्रत्येकी १५ नगरसेवक आहेत. एमआयएमकडे १२, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडे ११ नगरसेवक आहेत.

शिवसेना (शिंदे गट) आणि बहुजन समाज पार्टीकडे प्रत्येकी ३ नगरसेवक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे दोन, तर युनायटेड फोरममध्ये सहभागी असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे एक नगरसेवक आहे. विविध समित्यांवर प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी या पक्षांना किंवा अपक्षांना संयुक्त गट स्थापन करणे आवश्यक आहे.अमरावती मनपाच्या स्थायी समितीची सदस्य संख्या १६ आहे, तर शिक्षण, विधी, शहर सुधारणा आणि महिला व बालविकास यांसारख्या इतर सर्व समित्यांमध्ये प्रत्येकी ९ सदस्य असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande