
श्रीनगर , 20 जानेवारी (हिं.स.)।जम्मू–काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील उंचावरील भागात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी राबवण्यात येत असलेली व्यापक शोधमोहीम मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरू होती. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ही मोहीम रविवारी छात्रू क्षेत्रातील सिंहपोरा जवळ असलेल्या सोनार गाव परिसरात सुरू करण्यात आली होती. या सुरु असलेल्या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका पॅरा कमांडोने वीरमरण पत्करले, तर सात जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अचानक फेकलेल्या ग्रेनेडच्या छर्र्यांमुळे जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलाकडे पळून गेले.मात्र, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या एका मजबूत तळाचा पर्दाफाश केला असून, हा तळ १२,००० फूटांहून अधिक उंचीवर होता. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर हिवाळ्यातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात अन्नसामग्री, चादरी तसेच भांडी यांचा समावेश आहे. या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी जम्मू झोनचे आयजीपी भीम सेन टूटी आणि सीआरपीएफचे आयजी आर. गोपालकृष्ण राव यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस व लष्करी अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
दरम्यान, मंगळवारी सकाळी जम्मूच्या सतवारी येथे बलिदान दिलेल्या स्पेशल फोर्स कमांडो हवालदार गजेंद्र सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाचे नेतृत्व व्हाइट नाइट कोरचे कार्यवाहक चीफ ऑफ स्टाफ ब्रिगेडियर युधवीर सिंग सेखों यांनी केले. त्यानंतर वीर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावात—उत्तराखंड येथे—अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले.
सोमवारी दुपारी दहशतवाद्यांच्या तळांबाबत माहिती मिळवण्यासाठी अनेक स्थानिक नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणा अशा ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW)ची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांनी दहशतवाद्यांना रेशन आणि इतर अत्यावश्यक साहित्य पुरवण्यात मदत केली होती. जप्त करण्यात आलेल्या सामग्रीवरून हिवाळ्यात किमान चार दहशतवाद्यांसाठी हे साहित्य पुरेसे असल्याचे संकेत मिळतात.
लष्कराच्या व्हाइट नाइट कोरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना सांगितले की, ‘ऑपरेशन त्राशी-१’ सुरू असून, संपूर्ण परिसराची घेराबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांकडून ड्रोन आणि स्निफर डॉग्सच्या मदतीने दुर्गम व घनदाट जंगल असलेल्या भागात सखोल शोधमोहीम राबवली जात आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन ते तीन दहशतवादी परिसरात लपून बसल्याची शक्यता आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू विभागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून आणखी दहशतवाद्यांना घुसखोरीस प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नांबाबत गुप्तचर संस्थांनी अलर्ट जारी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode