वीबी-जी-राम-जी कायदा गरीबांच्या विरोधात - राहुल गांधी
लखनऊ, 20 जानेवारी (हिं.स.)। आपल्या संसदीय मतदारसंघ रायबरेलीच्या दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मनरेगाच्या जागी वीबी-जी-राम-जी कायदा आणल्याबद्दल भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी हा कायदा गरीबांच्या व
RAHUL GANDHI


लखनऊ, 20 जानेवारी (हिं.स.)। आपल्या संसदीय मतदारसंघ रायबरेलीच्या दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मनरेगाच्या जागी वीबी-जी-राम-जी कायदा आणल्याबद्दल भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी हा कायदा गरीबांच्या विरोधात असल्याचे सांगत मोदी सरकार गरीबांपेक्षा नोकरशहांना प्राधान्य देत असून सत्ता केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

यासंदर्भात राहुल गांधी म्हणाले की मोदी सरकारच्या ‘विकसित भारत–जी राम जी कायदा २०२५’ (वीबी-जी-राम-जी विधेयक) विरोधात काँग्रेस देशभर मनरेगा बचाव अभियान राबवत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करत म्हटले की मनरेगाचा उद्देश ग्रामीण बेरोजगारांना रोजगार व उत्पन्नाची संधी देणे हा होता; मात्र पंतप्रधान तसे इच्छित नाहीत. ते सत्ता केंद्रीकरण करू इच्छित असून ती नोकरशाहीकडे सोपवू पाहत आहेत. गरीबांना उपाशी मरू देण्याची त्यांची तयारी आहे. कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली गरीबांचे सुरक्षा कवच काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी या कायद्यातून महात्मा गांधींचे नाव हटवण्यात आले याचीही निंदा केली.

राहुल गांधी यांच्या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ऊंचाहार तालुक्यातील उमरन येथे आयोजित मनरेगा चौपाल. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की काँग्रेसच्या तीन टर्मच्या सरकारमध्ये मनरेगाची संकल्पना अशी होती की पंचायतांना जबाबदारी व आर्थिक अधिकार दिले जावेत. दुसरे उद्दिष्ट हे होते की देशातील गरीबांना ठरावीक किमान मजुरी मिळावी, जेणेकरून कुणालाही कमी मजुरी मिळू नये.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांनी म्हटले की मोदी संपूर्ण सत्ता आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत आणि ती नोकरशहांकडे सोपवू पाहत आहेत. मनरेगाचे नाव बदलणे ही फार मोठी गोष्ट नसली तरी गांधीजींचा अपमान झाला आहे, हे अधिक गंभीर आहे. त्याहून मोठी बाब म्हणजे गरीब जनतेकडून संरक्षण काढून घेतले गेले आहे. काँग्रेस सरकारच्या विचारधारेची मुळेच तोडली गेली आहेत. त्यामुळे काँग्रेस देशभर मनरेगा वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी लढत आहे.

राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदी देशाची संपत्ती अडाणी आणि अंबानींकडे वळवत आहेत. एकीकडे काँग्रेस जनतेचे संरक्षण करत आहे, तर दुसरीकडे मोदी जनतेचा पैसा काढून तो अडाणी आणि अंबानींना देण्यात गुंतले आहेत.

या वेळी खासदार के. एल. शर्मा, माजी आमदार अजयपाल सिंह यांच्यासह मोठ्या संख्येने मनरेगा मजूर व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी राहुल गांधींनी भएमऊ गेस्ट हाऊसमध्ये विविध क्षेत्रातील प्रतिनिधी व स्थानिक नेत्यांची भेट घेऊन पंचायत निवडणुकांबाबत सखोल चर्चा केली. त्यांनी आयटीआय मैदानावर सुरू असलेल्या रायबरेली प्रीमियर लीगचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी ३१ विकास कामांचे लोकार्पण आणि आठ नव्या कामांचे शिलान्यासही केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande