रुपया प्रति डॉलर 91च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर
मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। भारतीय रुपया मंगळवारी डॉलरच्या तुलनेत 91 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 90.93 वर उघडला आणि दिवसाच्या व्यवहारादरम्यान तो 91.01 या विक्रमी नीचांकी स्तरापर्यंत घसरला. परदेशी गुंतवणूकदारांच
Rupee hits against dollar


मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। भारतीय रुपया मंगळवारी डॉलरच्या तुलनेत 91 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 90.93 वर उघडला आणि दिवसाच्या व्यवहारादरम्यान तो 91.01 या विक्रमी नीचांकी स्तरापर्यंत घसरला. परदेशी गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण विक्रीमुळे आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या व्यापारी तणावामुळे रुपयावर मोठा दबाव दिसून येत आहे.

2026 च्या सुरुवातीपासूनच रुपया दबावाखाली असून, डिसेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा रुपया 90 च्या पुढे गेला होता. अवघ्या 20 दिवसांत त्याने 91 ची पातळीही ओलांडली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणांमुळे आणि जागतिक तणावामुळे गुंतवणूकदार सोने व डॉलरकडे वळत आहेत, त्यामुळे डॉलर अधिक मजबूत होत असून रुपया कमकुवत होत आहे.

रुपयाच्या घसरणीमागे प्रमुख कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातून होत असलेली माघार. जानेवारी 2026 च्या पहिल्या 20 दिवसांतच परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे रु. 29,315 कोटींची विक्री केली आहे. हे गुंतवणूकदार आपले पैसे परत घेताना रुपयाच्या बदल्यात डॉलर खरेदी करतात, त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया अधिक घसरतो.

याशिवाय, ट्रम्प यांच्या युरोपीय देशांवर टॅरिफ लावण्याच्या धमक्या आणि जागतिक राजकीय तणावामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार विकसनशील देशांतील गुंतवणूक काढून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डॉलर किंवा सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. मजबूत अमेरिकन अर्थव्यवस्था, कमी बेरोजगारी दर आणि उच्च व्याजदर टिकून राहण्याची शक्यता यामुळेही डॉलर अधिक बळकट होत आहे.

अमेरिकन सुप्रीम कोर्ट ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय देणार आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्या बाजूने गेल्यास जागतिक व्यापारी तणाव आणखी वाढू शकतो, तर विरोधात गेल्यास बाजाराला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सीआर फॉरेक्स ॲडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबारी यांच्या मते, रुपया जर 91.07 च्या वर गेला, तर तो लवकरच 91.70 ते 92.00 या श्रेणीत पोहोचू शकतो. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी बाजारात हस्तक्षेप करून रुपयाची अतिघसरण रोखण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या 90.30 ते 90.50 ही पातळी रुपयासाठी मजबूत आधार मानली जात आहे.

रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम आयातीवर होणार असून, भारतासाठी परदेशातून वस्तू खरेदी करणे अधिक महाग होईल. याशिवाय, परदेशात शिक्षण घेणे आणि प्रवास करणेही खर्चिक ठरणार आहे. पूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 असताना एका डॉलरमागे 50 रुपये खर्च करावे लागत होते, मात्र आता त्याच डॉलरमागे सुमारे 91 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण खर्चासह राहणीमानाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

डॉलरच्या तुलनेत कोणत्याही चलनाचे मूल्य घटल्यास त्याला चलनातील घसरण किंवा कमकुवत होणे असे म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये ‘करन्सी डेप्रिसिएशन’ म्हणतात. प्रत्येक देशाकडे परकीय चलन साठा असतो, ज्याच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यवहार केले जातात. या साठ्यातील घट-बढीचा थेट परिणाम चलनाच्या मूल्यात दिसून येतो. भारताकडे डॉलरचा साठा कमी झाल्यास रुपया कमकुवत होतो आणि साठा वाढल्यास रुपया मजबूत राहतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande