
लातूर, 20 जानेवारी, (हिं.स.)। देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू असली, तरी सोमवारपर्यंतम्हणजेच चौथ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांमधून शून्य अर्ज असल्याची अधिकृत माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच दिसणारी ही असामान्य शांतता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
मागील काही दिवसांत आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावला, हे जरी मान्य केले जात असले तरी आजपर्यंत एकाही गटात हालचाल न झाल्याने उमेदवारांच्या रणनीतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यावेळी कमी कालावधीत अधिक कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असल्याने इच्छुकांना तयारीसाठी पुरेसा अवकाश मिळत नसल्याची भावना उमटू लागली आहे. आवश्यक कागदपत्रे, हमी, दाखले आणि प्रक्रियेतील बारकावे यामुळे उमेदवार 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पक्षीय पातळीवर अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याची कुजबुजही सुरू आहे. स्थानिक आघाड्या, अंतर्गत समीकरणे आणि संभाव्य युतींच्या चर्चा जोर धरत असताना प्रत्यक्ष मैदानात मात्र नोंदणीचा
शून्यांक कायम आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेची उत्सुकता वाढली असून शेवटच्या दिवसांत अर्जाचा 'धडाका' होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दोन दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत देवणीतील निवडणूक रणांगणात शांततेचा पडदा कायम असून, पुढील घडामोडींसाठी राजकीय वर्तुळ श्वास रोखून पाहत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis