बडनेरात भाजपची नामुष्की कोअर कमिटीतील दोन दिग्गज पडले,  ८ पैकी एकही जागा नाही
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि धक्कादायक निकाल बडनेरा शहरातून समोर आलेला आहे. बडनेराच्या दोन प्रभागांतील एकूण ८ जागांवर भाजपचा पूर्णपणे ''सुपडा साफ'' झाला आहे. प्
बडनेरात भाजपची नामुष्की कोअर कमिटीतील दोन दिग्गज पडले,  ८ पैकी एकही जागा नाही


अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि धक्कादायक निकाल बडनेरा शहरातून समोर आलेला आहे. बडनेराच्या दोन प्रभागांतील एकूण ८ जागांवर भाजपचा पूर्णपणे 'सुपडा साफ' झाला आहे.

प्रभाग क्रमांक २२ (नवी बस्ती, बडनेरा) येथे आमदार राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान पार्टीने 'क्लीन स्वीप' करत चारही जागा जिंकल्या, तर प्रभाग क्रमांक २१ (जुनी बस्ती, बडनेरा) येथे एमआयएमने तीन जागांवर आणि युवा स्वाभिमान पार्टीने एका जागेवर विजय मिळवला. परिणामी भाजपला बडनेरा शहरातून अक्षरशः 'हद्दपार' व्हावे लागले आहे.

या पराभवामुळे बडनेरा परिसराशी थेट संबंधित असलेले भाजपचे दोन नेते मनपा निवडणूक प्रमुख तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंत डेहनकर व प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना जबरदस्त झटका बसलेला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही भाजपच्या शहरस्तरीय कोअर कमिटीतील प्रमुख चेहरे होते.जुनी वस्ती बडनेराचे रहिवासी असलेले प्रदेश, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तसेच नवी वस्ती बडनेराशी संबंधित असलेले माजी शहराध्यक्ष व मनपा निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर यांच्याकडे उमेदवार निश्चितीपासून ते निवडणूक रणनीती आखण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. पक्षाने शहरातील सर्व प्रमुख नेत्यांना स्वतंत्र प्रभागांची जबाबदारी दिली असताना, या दोघांनाही त्यांच्या स्वतःच्या गृहप्रभागांचीच जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात दोन्ही प्रभागांमध्ये भाजपसाठी निकाल 'टायं-टायं फिस्स' ठरला.

बडनेरातील एकूण ८ पैकी एकाही जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. एकेकाळी भाजपचा मजबूत गड मानला जाणारा नवी वस्ती बडनेरा याठिकाणी यावेळी युवा स्वाभिमान पार्टीने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. तर जुनी वस्ती बडनेरा येथे आधीच मर्यादित असलेली भाजपची शक्यता आता एमआयएम आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या वाढत्या प्रभावामुळे निकालाने पूर्णतः संपुष्टात आणलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande