
रत्नागिरी, 20 जानेवारी, (हिं. स.) : भडकंबा (ता. संगमेश्वर) येथील नवालेवाडी आणि पाष्टेवाडी प्राथमिक शाळांमध्ये कवी अशोक लोटणकर यांच्या शब्दांचे फटाके, धमाल गंमत आणि आभाळाचे घर या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कवी लोटणकर यांच्या सोबत मधू आठल्ये सर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ठाकर, नवाले गुरुजी, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर दादा नवाले, ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. मांडवकर, मुख्याध्यापिका प्रभा जाधव, अस्मिता शेडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मुलांना मार्गदर्शन करताना मधु आठल्ये सरांनी वाचनाचे आणि शालेय शिक्षणाचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. कोकण उत्कर्ष फाउंडेशनचे रवींद्र ठकार यांनी दुर्गम भागातील शाळांना पुस्तके वाटप करण्यात येणारी ही आतापर्यंतची पाचवी शाळा असल्याचे नमूद करून हा उपक्रम अन्य शाळांमध्येही राबविण्यात येणार असल्याचे नमूद केले.
मुख्याध्यापिका प्रभा जाधव यांनी मुलांना कवितांबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यांनी स्वतः लिहिलेली जिजाऊ ही कविता सादर केली.
कवी लोटणकर यांनी मुलांचे भावविश्व ओळखून सोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन केले आणि भेट दिलेल्या पुस्तकातील आंबेराई, पाऊस धारा, या चिमण्यांनो इत्यादी कविता मुलांसोबत सादर केल्या. निसर्ग सान्निध्यात वसलेल्या त्या दुर्गम शाळेत मुलांच्या बुलंद आवाजाने परिसर दणाणून गेला आणि कवितेचा जागर झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी