
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शहराचे लक्ष महापौरपदाकडे लागले आहे. येत्या २२ तारखेला महापौर आरक्षणाची सोडत निघणार असून त्यानंतर अवघ्या आठवडाभरात अमरावतीला नवीन महापौर मिळणार आहे. विशेष म्हणजे तब्बल चार वर्षांनंतर अमरावतीचा महापौर पुन्हा महापौर बंगल्यात विराजमान होणार असल्याने या बंगल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
अमरावती शहरातील विद्यापीठ रोडवर असलेला महापौर बंगला गेल्या चार वर्षांपासून अक्षरशः ओस पडलेला आहे. मागील काळात महापौर नसल्याने किंवा प्रशासकीय परिस्थितीमुळे या बंगल्याचा वापरच झाला नाही. परिणामी, महापौर बंगला सध्या भकास अवस्थेत दिसून येत आहे. इमारतीची रंगरंगोटी उखडलेली असून अनेक ठिकाणी दुरवस्था स्पष्टपणे जाणवते. चार वर्षांच्या कालावधीत बंगल्याच्या देखभाल-दुरुस्तीवर कोणतेही लक्ष देण्यात आले नसल्याचे चित्र आहे.महापौर बंगल्याच्या परिसरातील बागेचीही दयनीय अवस्था झाली आहे. नियमित पाणीपुरवठा नसल्यामुळे येथील झाडे व रोपे सुकून गेली आहेत. एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कोरडा आणि उजाड दिसत आहे. नागरिकांमध्येही याबाबत नाराजी व्यक्त केली जात असून, शहराच्या प्रथम नागरिकाच्या निवासस्थानाची अशी अवस्था होणे दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मात्र, नवीन महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन हालचालींना वेग आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत महापौर बंगल्याची दुरुस्ती, साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन महापौरासाठी बंगला सज्ज करण्यासाठी आवश्यक ती कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बंगल्याच्या अंतर्गत व बाह्य स्वरूपात बदल करून तो नव्या रूपात सजवला जाणार आहे.
२२ तारखेला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर महापौर कोणत्या प्रवर्गातून होणार हे स्पष्ट होईल. त्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार असून महापौर निवडीवर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर अमरावतीचा नवीन महापौर अधिकृतपणे महापौर बंगल्यात प्रवेश करेल.
चार वर्षांपासून ओस पडलेल्या महापौर बंगल्यात पुन्हा वर्दळ वाढणार, प्रशासकीय हालचाली सुरू होणार आणि शहराच्या प्रथम नागरिकाचे वास्तव्य होणार असल्याने महापौर बंगला पुन्हा चैतन्याने भरून निघेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी