
परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)।
नगरपालिका, महानगरपालिका निवडणूकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतसुध्दा प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वार्थाने सक्षम अशा उमेदवारांची शोधाशोध सुरु करतेवेळी अन्य पक्षातील इच्छुक उमेदवारांचीही पळवापळवी सुरु केली आहे.
या जिल्ह्यात गेल्या दोन चार महिन्यात नगरपालिका पाठोपाठ महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे झाली. प्रत्यक्ष निवडणूकीतसुध्दा उमेदवारी न मिळाल्यापाठोपाठ या इच्छुक उमेदवारांनी स्व पक्षाविरोधात बंडखोरी करीत अन्य पक्षात सहजपणे उडी मारीत, उमेदवारी पटकावीत आव्हाने उभे केले. त्यामुळेच दोन्ही निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय समिकरणे बदलली. लढतीचं चित्रसुध्दा पूर्णतः बदलले होते. त्याचे साद पडसाद निकालातून दिसून आले.
या पार्श्वभूमीवर या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतसुध्दा गटा-गणात गेल्या दोन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पक्षांतरांचे पेव उठले आहे. त्याचे कारणसुध्दा स्पष्ट आहे. या निवडणूकीतसुध्दा न.प. व मनपा प्रमाणे प्रमुख राजकीय पक्षांकडे शंभरटक्के जागा लढविण्याइतपत उमेदवार नाहीत. किंवा त्या त्या गटा गणातील लढतीत उतरण्याकरीता सक्षम असे उमेदवारसुध्दा नाहीत. त्यामुळेच या जिल्ह्यातील मातब्बर नेतेमंडळींनी त्या त्या गटा गणातील स्व पक्षासह अन्य पक्षातील इच्छुक उमेदवारांचा शोध घेऊन चाचपणी सुरु केली आहे. त्यातून काही सक्षम उमेदवार गळास लागतील का, या दृष्टीनेसुध्दा डावपेच टाकले आहेत. त्याचे परिणामसुध्दा या दोन-चार दिवसात दिसू लागले आहेत. त्यामुळेच या निवडणूकीतसुध्दा न.प. व मनपा प्रमाणे त्या त्या तालुक्यात आयात केलेल्या उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारी यादीत समावेश असेल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत गटा गणातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतीम मुदतीच्या आत या जिल्ह्यात पक्षांतराचे हे सोहळे मोठ्या प्रमाणावर होतील. त्यातून एक एक धक्के बसतील, असे चित्र आहे.
प्रा. किरण सोनटक्के शिवसेना उबाठा गटाच्या गळाला...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याचे कारणही स्पष्ट केले. परंतु, प्रा. सोनटक्के यांची पुढील दिशाही या राजीनाम्या पाठोपाठ स्पष्टपणे दिसून आली. विशेषतः शिवसेना उबाठा गटाच्या माध्यमातून ते परभणी तालुक्यातील जांब या गटातून निवडणूक रिंगणात उतरतील, अशी खूलेआमपणे कुरबुरसुध्दा सुरु झाली.
मनिषा केंद्रे भारतीय जनता पार्टीत दाखल...
जिंतूर तालुक्यातील या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनिषा केंद्रे यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली, प्रमुख उपस्थितीत केंद्रे यांनी हे पक्षांतर केले. केंद्रे या भाजपाद्वारे जिल्हा परिषद निवडणूकीच्या रिंगणात असतील, अशी शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis