जागलमधून ग्रामीण भागात साहित्याची ओळख होऊन रुची वाढेल: माजी मंत्री बाळासाहेब जाधव
किनी कदू येथे चौथे एकदिवसीय ''जागल'' मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न लातूर, 20 जानेवारी (हिं.स.)। समाजातील तरुण पिढी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे दिशाहीन बनली असून, त्यांचे मोठे शैक्षणिक व वैचारिक नुकसान होत आहे. अशा काळात ग्रामीण भागातील
जागल


किनी कदू येथे चौथे एकदिवसीय 'जागल' मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

लातूर, 20 जानेवारी (हिं.स.)।

समाजातील तरुण पिढी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे दिशाहीन बनली असून, त्यांचे मोठे शैक्षणिक व वैचारिक नुकसान होत आहे. अशा काळात ग्रामीण भागातील तरुणांना दर्जेदार साहित्याची ओळख होणे गरजेचे आहे. 'जागल' सारख्या एकदिवसीय साहित्य संमेलनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मराठी साहित्याविषयी निश्चितच रुची वाढेल, असे आग्रही प्रतिपादन माजी मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब जाधव यांनी केले.

​मराठवाडा साहित्य परिषद, अहमदपूरच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील किनी कदू येथील 'बसवसृष्टी' व 'संविधान पार्क' परिसरात आयोजित चौथ्या 'जागल' एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी व कादंबरीकार प्रा. फ. म. शहाजिंदे हे होते. याप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय पाटील (माजी सरपंच, किनी कदू) व निमंत्रक प्रा. डॉ. भीमराव पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

​संमेलनाची सुरुवात सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे ६६ हजार प्राथमिक शाळा बंद पडणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील मुले कॉन्व्हेंट संस्कृतीकडे वळत असली, तरी आजवर सर्व क्षेत्रांत ज्यांनी यशाचे झेंडे रोवले आहेत, ते मराठी शाळेत शिकलेलेच विद्यार्थी आहेत, हे विसरता कामा नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande