
बेंगळुरू, 20 जानेवारी (हिं.स.)। कर्नाटक पोलिसांचे पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी (नागरिक हक्क अंमलबजावणी) डॉ. के. रामचंद्र राव यांना एका व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओप्रकरणी राज्य सरकारने निलंबित केले आहे. सोमवार, 19 जानेवारी रोजी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाला मोठे वळण मिळाले. व्हिडिओमध्ये राव अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचा दावा करण्यात आला असून, यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट केले होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव यांनी गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना राव यांनी हा व्हिडिओ खोटा आणि मॉर्फ केलेला असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, याबाबत पुढील कारवाईसाठी ते वकिलांचा सल्ला घेणार आहेत. मात्र, सरकारने प्राथमिक तपासाच्या आधारे तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.
निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे की, राव यांनी अश्लील पद्धतीने वर्तन केले असून, ते एका सरकारी अधिकाऱ्यासाठी अयोग्य आणि सरकारसाठी लाजिरवाणे आहे. त्यांच्या वर्तनाने नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशी प्रलंबित असेपर्यंत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, या काळात राज्य सरकारच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलताना राव म्हणाले की, हे कसे आणि कधी झाले, याचा विचार ते स्वतःही करत आहेत. आजच्या काळात कोणाचाही बनावट व्हिडीओ तयार केला जाऊ शकतो आणि त्यांना या व्हिडिओबाबत कोणतीही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. हा व्हिडिओ जुना आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी तो आठ वर्षांपूर्वीचा, बेळगावीतील कार्यकाळातील असू शकतो, असे म्हटले. त्यांनी गृहमंत्र्यांना चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नमूद केले.
दरम्यान, कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बलकर यांनी सांगितले की, जर कोणी चुकीचे कृत्य केले असेल तर सरकार निश्चितच कारवाई करेल. या प्रकरणावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्येष्ठ भाजप आमदार आणि माजी मंत्री एस. सुरेश कुमार यांनी हे कृत्य अक्षम्य असल्याचे सांगत, यामुळे संपूर्ण पोलिस विभागावर डाग लागल्याचे म्हटले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, वरिष्ठ अधिकाऱ्याने गणवेशात आणि स्वतःच्या कार्यालयात असे वर्तन केल्याने जनतेत पोलिस विभागाबाबत संशय निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule