
रत्नागिरी, 20 जानेवारी, (हिं. स.) : लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘यश-शांतीसाठी न्यू वे’ हा उपक्रम दि. २१ आणि २२ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित केला आहे. हा उपक्रम विनामूल्य असून कुटुंबातील सर्व वयोगटांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्राचा त्यामध्ये समावेश राहणार असल्याचे मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक मयूर चंदने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक सुहास गुधाटे, रत्नागिरी स्थानिक केंद्राचे ज्येष्ठ साधक श्री. नाईक, डॉ .विवेक इनामदार, विलास सनगरे, सतीश पालकर उपस्थित होते.
श्री. चंदने यांनी सांगितले की, विद्यार्थी, युवावर्गाला आयुष्यामध्ये यश हवे असते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. परंतु त्यामध्ये दोन प्रकारचे अडथळे येतात. पहिला अडथळा म्हणजे यशासाठी प्रयत्न करता करता त्याचाच ताण येतो. दुसरा अडथळा म्हणजे यश मिळाले नाही तर निराशा भेडसावते. मनशक्ती केंद्रातर्फे ताणमुक्त अभ्यासयशासाठी प्रयत्न कसे करावे याचे मार्गदर्शन केले जाते.
अभ्यासाचा ताण, पालकांच्या अपेक्षा तसेच स्पर्धा यांचा ताण असह्य झाला तर मुले अथवा तरुण आत्महत्येलाही प्रवृत्त होण्याची शक्यता असते. अशा समस्यांवर विज्ञानशुद्ध उपाय सुचवणारे उपक्रम रत्नागिरी येथे आयोजित होत आहेत. सध्या परीक्षांचा काळ आहे. येणाऱ्या परीक्षेला ताणमुक्त मनाने कसे सामारे जायचे यासाठी खास विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाच्या सोप्या युक्त्या’ या विषयावरील मार्गदर्शन दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते १० या वेळात आयोजित केले आहे. युवकांसाठी ‘दिशा ध्येय पूर्तीची’ हा उपक्रम दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते १० या काळात होईल. दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १० ते १२ या वेळात गर्भवती भगिनी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांसाठी ‘गर्भसंस्कार’ या विषयावर मार्गदर्शन केले जाईल.
कुटुंबातील ताण कमी व्हावे, सुख आणि शांती वाढावी यासाठी ‘मनशांती, ताणमुक्ती आणि ध्यान’ या विषयावरील सत्र दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२.३० ते दुपारी २ या वेळात होईल.
मुला-मुलींमध्ये अगदी लहान वयात म्हणजे १ ते ७ वर्षे या वयात प्रचंड ग्रहणशक्ती असते. याचा उपयोग त्यांना योग्य संस्कार आणि योग्य दिशा देण्यासाठी होऊ शकतो. यात पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. यासाठी दि. २१ आणि २२ जानेवारी २०२६ या दोन्ही दिवशी या वयोगटातील पालकांसाठी किंवा या वयोगटासाठी काम करणारे बालवाडी शिक्षक, अंगणवाडी सेविका व अन्य लोकांसाठी सकाळी ‘मुलांना घडवताना’ या विषयावर मार्गदर्शन सत्र होईल. दि. २१ जानेवारीला हे सत्र दुपारी २.३० ते ४ या वेळात आणि २२ तारखेला सकाळी १० ते १२ या वेळात होईल.
८ ते २१ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी मुलांचा सर्वांगीण विकास, मोबाइल आणि त्यातील गेम्सपासून मुलांना दूर कसे ठेवावे, मुला-मुलींचा हट्टीपणा व चंचलता कशी कमी करावी इ. बाबत ‘पालकत्वाची दिशा’ या महत्त्वपूर्ण विषयावर दि. २१ आणि २२ या दोन्ही दिवशी सायंकाळी ४.३० ते ६ या वेळात सत्र होईल.
माणसाचे जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी त्याचे आरोग्य महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. प्रत्येकाला आपण निरोगी राहावेसे वाटत असते. त्यासाठी ते वेगवेगळ्या उपाययोजना शारीरिक पातळीवर करत असतात. परंतु पूर्णत: निरोगी रहाण्यासाठी तेवढे पूरेसे आहे का? आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मनाचा यात कसा सहभाग आहे? या महत्त्वपूर्ण विषयावर दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० ते २ या काळात ‘आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग’ या विषयावर मार्गदर्शनपर सत्र होईल.
‘शिक्षक सक्षमीकरण’ या विषयावर २२ जानेवारी २०२६ या रोजी दु.२.३० ते ४ या काळात विशेष सत्र होईल. ‘मत्सरघात परिणाम व उपाय’ हे सत्र दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ८ या वेळात होईल.
‘मनशक्ती’च्या ‘माइंड जिम’ या वैशिष्ट्यपूर्ण दालनामध्ये उजव्या-डाव्या मेंदूच्या समतोल विकासासाठी प्रत्यक्ष भाग घेता येणारे मनोरंजक खेळ, ॲक्टिव्हिटीज, प्रयोग, मानस चाचण्या असणार आहेत. त्यासाठी सकाळी ९ ते ७ पर्यंत विविध सत्रे आयोजित केलेली आहेत.
या सपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते दि. २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होईल.
समाजामध्ये विविध पातळ्यांवर सेवाभावाने कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि त्यांनी चालविलेल्या संस्था आहेत. मनशक्ती केंद्रातर्फे रत्नागिरीमधील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रम, पावस आणि आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ या संस्थांचा सन्मान होणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा दि. २२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता होईल. प्रत्येकी ५०,००० रुपयांची देणगी त्यांना प्रदान करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी