
नांदेड, 20 जानेवारी, (हिं.स.)नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या आणि दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी गंभीर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत विविध तालुक्यातील सात शिक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. काही शिक्षकांचे प्रमाणपत्र संबंधित रुग्णालयाने निर्गमितच केले नसल्याचे स्पष्ट झाले तर काही शिक्षक पडताळणी दरम्यान प्रमाणपत्र सादर करू शकले नाही.
त्यामुळे उपरोक्त ७ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात या शिक्षकांना खाजगी व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांचे मुख्यालय बदलून अन्य पंचायत समित्यांमध्ये करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ माजली असून बोगस कागदपत्रांच्या आधारे सवलती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांविरुद्ध दोन दिवसांत दोषारोपपत्र सादर करण्याचे
आदेश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis