मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर धावत्या बसला भीषण आग
मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील सर्वाधिक रहदारीचा मार्ग असणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळी एका धावत्या बसला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात मेट्रो लाईन-७ (रेड लाईन) च्या
Mumbai Western Express Highway Bus Fire


Mumbai Western Express Highway Bus Fire


मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। मुंबईतील सर्वाधिक रहदारीचा मार्ग असणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळी एका धावत्या बसला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात मेट्रो लाईन-७ (रेड लाईन) च्या पुलाखाली ही घटना घडली. बस मालाडच्या दिशेने जात असताना तिच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच संपूर्ण बसने पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक व वाहकाने तत्काळ प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

क्षणातच बस आगीच्या विळख्यात सापडली आणि ती पूर्णतः भस्मसात झाली. आगीचे लोळ वर मेट्रो पुलापर्यंत पोहोचत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आगीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे.

या आगीमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मेट्रो रुळांच्या अगदी जवळ आग पोहोचत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रो प्रशासनाने या मार्गावरील सेवा काही काळासाठी थांबवली, त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली, तर पोलिसांनीही तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande