
पुणे, 20 जानेवारी, (हिं.स.)। आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व असताना, त्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढाव्यात, असा आग्रह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वाढत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील लढत दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप–शिवसेना अशी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे १३, तर भाजपचे ७ सदस्य निवडून आले होते. त्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य कायम होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि काँग्रेसचे भोरचे दुसरे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुरंदर, भोर तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे. दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल आधीपासूनच प्रभावी मानले जातात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु