
नवी मुंबई , 20 जानेवारी (हिं.स.)। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला - क्रीडा महोत्सव 2026’ अंतर्गत सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानावर शालेय समूह नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. सदर स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळा तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य, पारंपरिक लोकनृत्य तसेच बहारदार कोळीगीतांवरील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विशेष कौतुक केले.
तसेच शालेय समूह नृत्य स्पर्धेत प्राथमिक विद्या मंदिर, बेलापूर यांनी प्रथम पारितोषिक पटकावला, पीपल्स एज्युकेशन इंग्रजी माध्यम शाळा, सीबीडी बेलापूर यांनी द्वितीय पारितोषिक, तर पी. एस. सेंटर स्कूल यांनी तृतीय पारितोषिक मिळवला. तसेच गौरव स्कूल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, हा महोत्सव येत्या २५ तारखेपर्यंत सुनील गावस्कर मैदान येथे सुरू राहणार असून, या कालावधीत नागरिकांसाठी विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध असणार आहे. तरी सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत शाळकरी विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच सीबीडी मधील नागरिक व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर