फक्त पुरस्कारांसाठी कला शिकू नये- डॉ. नर्तकी नटराजन
छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)। कलाकाराने गुरूशी एकनिष्ठ असावे. श्रोत्यांसाठी, पुरस्कारांसाठी कलाभिलाषी होऊ नये किंवा कला शिकू नये आणि सादर करू नये. स्वतःसाठी कला सादर करावी. कला स्वयंभू असते. तिला कोणाच्या प्रशंसेची गरज नाही, असे प्रतिपा
फक्त पुरस्कारांसाठी कला शिकू नये-  डॉ. नर्तकी नटराजन


छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)।

कलाकाराने गुरूशी एकनिष्ठ असावे. श्रोत्यांसाठी, पुरस्कारांसाठी कलाभिलाषी होऊ नये किंवा कला शिकू नये आणि सादर करू नये. स्वतःसाठी कला सादर करावी. कला स्वयंभू असते. तिला कोणाच्या प्रशंसेची गरज नाही, असे प्रतिपादन डॉ. नर्तकी नटराजन यांनी केले. ओडिसी नृत्यगुरु गुरु केलुचरण महापात्र यांचे कार्याचे संग्रहण व महत्त्व यावर शेरॉन लावेन यांनी प्रकाशझोत टाकला.

शारंगदेव महोत्सवाच्या 'शारंगदेव प्रसंग' उपक्रमात कला क्षेत्रात कार्यरत मान्यवर कलाकार, अभ्यासकांनी व्याख्यानाद्वारे प्रभावी भाष्य केले. आळंदी येथील अवधूत गांधी यांनी 'वारकरी संगीत परंपरा' या सप्रयोग व्याख्यानातून वारकरी संगीत परंपरा उलगडली. वारीचा अर्थ, नामसंकिर्तनचा प्रभाव, गजर आणि वारीतील गजरातील फरक गांधी यांनी सांगितला. महाराष्ट्रातील संत परंपरेने सहज जीवनाची शिकवण दिल्याचे सांगून वारीत नाम गजर करण्याच्या विविध शैली, चाली गायल्या. गजर करताना चित्रपट गीतांची गरज नसून भक्तीची गरज असल्याचे अधोरेखित केले. कीर्तन परंपरेत नृत्य करून गाण्याचीही पद्धत त्यांनी सादर केली. वारकरी विणेचे वैशिष्ट्य आणि टाळ, मृदंग वारकरी संगीताचे अविभाज्य भाग असल्याचे विवेचन केले. वासुदेव, गोंधळ, भारूड, गवळण प्रकार सादर करीत निरूपणही केले.

डॉ. नर्तकी नटराजन यांनी 'भरतनाट्यममधील पारंपरिक रत्न' या विषयावर व्याख्यान दिले. 'पद्मश्री'ने सन्मानित डॉ. नर्तकी नटराज या पहिल्या ट्रान्सजेंडर आहेत. त्यांनी आपला कलाकार होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला.

पद्मश्री शशधर आचार्य यांनी छाऊ नृत्यावर व्याख्यान दिले. भारतीय युद्धकलेतून प्रेरणा घेऊन छाऊ नृत्य विकसित झाले. १६ व्या शतकात छाऊ नृत्यरूप मिळाले. यात मुखवट्याचा वापर केला जातो. छऊचे लय ताल त्याचे चरित्र आहे. बाघ चाल, बगळा चाल, मोराची चाल, हंसाची चाल, हरणाची चाल अशा १८ चालींचे प्रात्यक्षिक त्यांनी केले.

'संगीत परंपरा आणि सृजनशीलता' या विषयावर गायिका अश्विनी भिडे यांनी विचार मांडले. दोन हजार वर्षांच्या संगीत परंपरेत पूर्वजांनी खूप काम केले आहे. नवसृजन क्वचितच होत असावे. प्रत्येकाचे संगीताबाबतचे आकलन आणि निष्कर्ष वेगळे असतात. कलाकार आणि श्रोता दोघेही सृजन करणारेच असतात. राग सादर करण्यासाठी रागाशी मैत्री करायला हवी, असे भिडे म्हणाल्या. गुरू काय देतो यापेक्षा शिष्य काय घेतो त्याला महत्त्व आहे असे त्यांनी नमूद केले. महागामी गुरूकुलाच्या संचालक पार्वती दत्ता यांचे 'ओडिसी नृत्यातील 'वक्ष-कटी-पार्श्व विन्यास' विषयावर व्याख्यान झाले. त्यांच्या शिष्यांनी भंगभेदांतर्गत समभंग, अभंग, त्रिभंग आणि अतीभंग सादर केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande