
पुणे, 20 जानेवारी, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत समाविष्ट गावांमधून प्रथमच १६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना या गावांमधील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि कचरा, पाणीपुरवठा, मिळकतकराचा रखडलेला प्रश्न अशा समस्यांचे निवारण करून या भागाला न्याय देण्याची संधी निर्माण झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने प्रभागरचना अंतिम केली. यामध्ये ४१ प्रभागांत १६५ नगरसेवकांचा समावेश आहे. २०१७ आणि २०२१ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांनी २०२६च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच सहभाग घेतला. महापालिकेने प्रभागरचना करताना काही प्रभाग हे १०० टक्के समाविष्ट गावांच्या हद्दीत आहेत. तर काही प्रभागांमध्ये ४० ते ५० टक्के भाग गावांचा आणि उर्वरित भाग जुन्या हद्दीचा आहे. या प्रभागरचनेत समाविष्ट गावांचा थेट सात प्रभागांवर प्रभाव पडला. त्यामुळे या गावांमध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांसह अन्य पदांवर काम केलेले राजकीय कार्यकर्ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक होते. सर्वच राजकीय पक्षांनी व्यवस्थित प्रतिनिधित्व या गावांना दिले असते तर १८ ते १९ नगरसेवक या भागांतून निवडून येऊ शकले असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु