नांदेड - पालकांनी आदर्श कृतीतून मुलांमध्ये संस्कार रुजवावेत - न्या. जाधव
नांदेड, 20 जानेवारी, (हिं.स.)। लहान मुले सर्वप्रथम आपल्या पालकांचे अनुकरण करीत असतात, त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या आदर्श कृतीतून मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत, असे प्रतिपादन हदगाव तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायमूर्ती ए. बी. जाधव य
नांदेड - पालकांनी आदर्श कृतीतून मुलांमध्ये संस्कार रुजवावेत - न्या. जाधव


नांदेड, 20 जानेवारी, (हिं.स.)। लहान मुले सर्वप्रथम आपल्या पालकांचे अनुकरण करीत असतात, त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या आदर्श कृतीतून मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत, असे प्रतिपादन हदगाव तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायमूर्ती ए. बी. जाधव यांनी केले.

तालुका विधिसेवा समिती आणि वकील संघ, हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तामसा येथे आयोजित फिरते लोकअदालत आणि कायदेविषयक शिबिराच्या अध्यक्षीय समारोपाच्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एच. एम. मदनी यांच्यासह विस्तार अधिकारी व्ही. एम. मुंडकर, सरपंच आनंदराव पाटील-घंटलवार, माजी सरपंच बालाजी महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ए. बी. जाधव म्हणाले की, आजची मुले देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत विश्वासाने संवाद साधून मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी निर्माण झालेल्या कायद्यांची उपयुक्तता आणि महत्त्व गोष्टी रूपाने उपस्थितांना सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांचा गौरव करण्यात आला.

अॅड. डी. एस. पाईकराव, अॅड. डी. आर. सूर्यवंशी, अॅड. बी. ए. कोंडामंगले, अॅड. रामदास डवरे आदी मान्यवरांनी विविध कायदेविषयक मार्गदर्शन केले. नंतरच्या सत्रात पार पडलेल्या लोकअदालतमध्ये दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande