
बीड, 20 जानेवारी (हिं.स) | स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे अभ्यागत समितीची बैठक राष्ट्र्वादी खासदार बजरंग सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मराठवाड्यातील ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार, वेळेवर व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या, अश्या सूचना खा.सोनवणे यांनी दिल्या. या उद्देशाने रुग्णालयातील विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.
रुग्णालयाच्या प्रशासकीय बाबींशी संबंधित असलेल्या या महत्वाच्या बैठकीस यांच्यासह अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, समिती सदस्य माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी, वसंत मुंडे, संजीवनी देशमुख, रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत CT Scan तपासणीनंतर रेडिओलॉजिस्टकडून वेळेत अहवाल न मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. रुग्णालयातील रेडिओलॉजिस्टची मंजूर पदे व प्रत्यक्ष कार्यरत संख्या, त्यांची उपस्थिती व कामाचे तास यावर स्पष्टता आणण्याच्या सूचना करण्यात आल्या. मशीन कार्यरत असतानाही रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा यादीला सामोरे जावे लागत असल्याने अपॉईंटमेंट प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
सुपर स्पेशालिटी विभागातील डॉक्टरांची मंजूर व कार्यरत संख्या, उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रभावी वापर, तसेच काही सेवा अपेक्षित क्षमतेने कार्यरत नसल्याबाबतही चर्चा झाली. 2D Echo तपासणीसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचित करण्यात आले. कार्डियोलॉजिस्ट व न्युरोसर्जन यांच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन त्या सेवा अधिक बळकट करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय दंत महाविद्यालय व नर्सिंग कॉलेज सुरू करण्याच्या प्रस्तावांच्या सद्यस्थितीची माहिती बैठकीत घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने या प्रस्तावांना गती देऊन भविष्यात अधिक मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात आला.
ग्रामीण भागातील तसेच संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांना त्यांच्या परिसरातच आधुनिक, विश्वासार्ह व दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश खासदार बजरंग सोनवणे यांनी संबंधित प्रशासनाला दिले. आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा पुढेही सुरूच राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis