
पुणे, 20 जानेवारी (हिं.स.) : सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या वतीने इंडियन सोसायटी ऑफ लेबर इकॉनॉमिक्स (ISLE) यांच्या ६६ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात करण्यात आले.
परिषदेची सुरुवात “कार्यान्वित होणारी वाढ : ग्लोबल साउथमधील रोजगार, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता” या विषयावरील उच्चस्तरीय गोलमेज चर्चेने झाली. या चर्चेत कामगार बाजारपेठा, सामाजिक व आर्थिक असमानता, हवामान बदल, शिक्षण तसेच आर्थिक केंद्रीकरण यांमधील परस्परसंबंधांवर सखोल चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ISLE च्या कम्युनिकेशन डायरेक्टर प्रियांका त्यागी यांनी सांगितले की, “कामगार व रोजगार क्षेत्रातील संशोधनाधारित संवाद बळकट करणे आणि शैक्षणिक संशोधन व सार्वजनिक धोरण यांच्यात मजबूत दुवा निर्माण करणे हे ISLE चे प्रमुख उद्दिष्ट आहे.” त्यांनी कामगार बाजारपेठेतील बदलते आव्हान आणि त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणण्यात ISLE च्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
यावेळी सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या अधिष्ठाता, मानवविद्या व सामाजिक शास्त्रे विभागाच्या संचालिका तसेच परिषदेच्या आयोजन सचिव डॉ. ज्योती चंदीरमणी यांनी, “जटिल आणि सतत बदलणाऱ्या सामाजिक-आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शैक्षणिक सहकार्य आणि संस्थात्मक भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन केले.
या परिषदेमुळे रोजगार, समावेशक विकास आणि शाश्वततेसंदर्भातील धोरणात्मक चर्चांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु