
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)निवडणुकीत जनतेने नाकारलेले भाजपचे काहीजण ‘स्वीकृत सदस्य’च्या माध्यमातून मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, उमेदवारी दिलेल्या मंडळींना स्वीकृत सदस्यपदी संधी न देण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांचे ते स्वप्न भंगले आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच ८७ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले आहे. भाजपला महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १० जणांना पाठवता येणार आहे. भाजपने सर्व १०२ जागा स्वबळावर लढविल्या, त्यापैकी १५ जण पराभूत झाले आहेत. त्यापैकी काहीजण स्वीकृत सदस्यपदी संधी मिळवून मागच्या दाराने सभागृहात जाण्याच्या तयारीत आहेत. यात माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, नागेश ताकमोगे, बाबा करगुळे या मातब्बर मानल्या जाणाऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी त्यांनी ‘लॉबिंग’ही सुरू केले आहे. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी देऊ नये, असा आदेश प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे जनतेने नाकारल्यानंतरही मागच्या दाराने नगरसेवक बनण्याचे त्यांचे मनसुबे पक्षाने धुळीस मिळवले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड