
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)महापालिका निवडणूक संपते की नाही तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. भाजपला सोलापूरसह राज्यात महापालिका निवडणुकीत मिळालेल्या या यशानंतर आता भाजपची गाडी सुसाट आहे. या विजयाचे किंगमेकर पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत. आता झेडपीच्या निवडणुकीची सूत्रे ही त्यांच्याच ताब्यात आहेत.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मोहिते पाटील यांचा लीड रोल असल्याने ते माजी आमदार संजय शिंदे यांना मान्य नाही. त्यांनी लगेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात भेट घेतली. करमाळ्यात भाजप नेत्या रश्मी बागल आणि दादांच्या राष्ट्रवादीचे संजय मामा एकत्र येत आहेत. या युतीला पालकमंत्र्यांनी पण दुजोरा दिला आहे.दुसरीकडे सांगोल्यात नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजप ताक सुद्धा फुंकून पित आहे. त्यामुळे या तालुक्यात शहाजी बापूंना झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीत सोबत घेण्याचा जवळजवळ निर्णय निश्चित झाल्याची माहिती आहे. शहाजी पाटील यांनी सुद्धा सोलापुरात जयकुमार गोरे यांची भेट घेतली आहे. सांगोल्यात भाजप शिवसेना एक झाली तर माजी आमदार दिपक आबा आणि शेकापची आघाडी होईल किंवा भाजप, शेकाप, शिवसेना आणि दीपक आबा हे सर्वच एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड