
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, २१ जानेवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने सर्वच गटातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, कामती बु. गटातून भाजपकडून लांबोटीतील विमल तानाजी खताळ आणि विरवडे बु. येथील कोमल अंकुश आवताडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरवडे बु. येथील अश्विनी नरसिंह पाटील आणि चिंचोलीकाटीतील अनिता भोसले इच्छुक आहेत. भाजपकडून खताळ कुटुंबाला आणि राष्ट्रवादीकडून नरसिंह पाटील यांच्याच घरात उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. पक्षाकडून ‘बी’ फॉर्म कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लांबोटीतील तानाजी खताळ यांनी २०१७ मध्ये कामती गटातून विजय मिळविला होता. त्यांनी भीमा लोकशक्ती परिवार गटातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी स्व. खताळ यांनी जवळपास दोन हजार मताधिक्यांनी विजय मिळविला होता. सावळेश्वर, लांबोटी, गोटेवाडी, कोळेगाव, नांदगाव, हराळवाडी, कोरवली, लमाणतांडा, पिरटाकळी यासह इतरही गावांमधून त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड