
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)
रब्बी हंगाम ऐन भरात असताना तिवसा तालुक्यातील शेतकरी आज दोन आघाड्यांवर झुंज देत आहे. एकीकडे पिकांना जीवदान देणारा पुरिया मिळत नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेले कृषी कार्यालयच वेळेवर उघडत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.तालुक्यात अनेक कृषिसेवा केंद्रांवर पुरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना इतर खत, औषधे व महागड्या वस्तू सक्तीने खरेदी करण्यास भागपाडले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. युरिया हवा असेल तर बाकी सामान घ्यावेच लागेल, अशी अट घालण्यात येत असल्याने गरज नसलेल्या वस्तूंवरही शेतकऱ्यांचा पैसा खर्च होत आहे. आधीच सोयाबीनच्या नुकसानीने मोडीत निघालेला शेतकरी आता या सक्तीच्या विक्रीमुळे अधिकच कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, इकडून तिकडून उसनवारी करून रबीचे पीक उभे केले. पिकातून थोडाफार पैसा हातात येईल, हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र युरियाच्या काळाबाजारामुळे आणि कृषिसेवा केंद्रांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले जात आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संजय देशमुख, सुरेंद्र भिवगडे व मनोज काळमेघ यांनी तिवसा कृषी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. मात्र कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ वाजता असताना १२.३० वाजेपर्यंत तालुका कृषी अधिकारी वगळता एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.
तक्रार करा कारवाई करू
युरियाच्या विक्रीबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा अनधिकृत विक्री होऊ नये, यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून संबंधित कृषी सेवकांना स्पष्ट सूचना देणारा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी थेट कार्यालयात लेखी तक्रार करावी. प्राप्त तक्रारींची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल. कार्यालयीन व शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने काही कर्मचारी बाहेर पाठविण्यात आले होते. त्यामुळे कार्यालयात कर्मचारी संख्या कमी होती.
- हेमलता इंगळे, तालुका कृषी अधिकारी, तिवसा.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी