
पुणे, 20 जानेवारी, (हिं.स.) - भारतीय स्त्रीशक्ती जागरणच्या वतीने नुकताच ‘सावित्री महिला जागृती मेळावा’ घेण्यात आला. नवीन मराठी शाळेच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात प्रेरणादायी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव सुनिती पारुंडेकर उपस्थित होत्या.
एकपात्री कलाकार दीपाली कात्रे यांनी सावित्रीबाईंची धैर्यशाली व संघर्षमय वाटचाल सादर केली. डान्स अकॅडेमीच्या नृत्यांगनांनी ‘रान मोकाट वारं सोसाट’ या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याविष्काराने, संध्या कुलकर्णी यांच्या सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव गीताने आणि मेघना जोग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ओव्या सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात संध्या कुलकर्णी यांच्या स्फूर्ती गीताने झाली.
‘Women on Wheels’ या संकल्पनेअंतर्गत पारंपरिक चौकटी मोडून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या चार महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ट्रॅक्टर चालवणाऱ्या रश्मी ठोसर, रिक्षा ते कॅब चालक म्हणून वाटचाल करणाऱ्या शीतल सातपुते , पुणे मेट्रोच्या लोको पायलट पूजा काळे आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट या बाईक वरून ६ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या आयटी अभियंता ऐश्वर्या मराठे नगरकर यांचा समावेश होता. या महिलांनी आपल्या संघर्ष, धाडस आणि यशाच्या कथा सांगताना महिला सर्व क्षेत्रात सक्षमपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त केला.
शीतल यांनी शैक्षणिक कमतरतेमुळे रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांच्या मेहनतीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी कॅब व्यवसाय सुरू केला आणि दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
पुणे मेट्रोच्या पायलट पूजा यांनी लोको पायलट होण्यासाठी आवश्यक असलेली कठोर निवड प्रक्रिया आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी या विषयी माहिती दिली. तर रश्मी ठोसर यांनी पतीच्या प्रोत्साहनाने शेती व्यवसायात ट्रॅक्टर चालवायला शिकल्याचे सांगितले. ऐश्वर्या यांनी जिद्द, शिस्त आणि नियोजनाच्या जोरावर ६ हजार किमीचा बाइक प्रवास पूर्ण केला. हा प्रवास विक्रमासाठी नसून भारताचे सौंदर्य ड्रोन चित्रणातून जगासमोर आणण्याच्या उद्देशाने केल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी बर्वे यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ ने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु