

मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. 23 जानेवारी रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम ठाकरेंची शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे आयोजित करत असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर हा पहिलाच प्रसंग असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात दिसणार आहेत. यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत निवडणूक लढवली आणि त्यांना एकूण 71 जागांवर यश मिळाले. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या ठाकरेंना यंदा भाजप महायुतीकडून मोठा धक्का बसला. 89 जागा मिळवत भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा पुढील महापौर महायुतीचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठी अस्मितेच्या आणि मुंबईच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा जवळ आले होते. जुलै 2025 मध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात पहिल्यांदाच दोघे एकाच व्यासपीठावर दिसले. त्यानंतर रक्षाबंधन, दिवाळी यांसारख्या सणांमध्येही ठाकरे कुटुंबीय एकत्र दिसले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवाजी पार्कवर झालेली संयुक्त सभा आणि शाखांना दिलेल्या भेटींमुळे मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला.
दादर, वरळी, लालबाग, परळ, विक्रोळी, भांडूप अशा भागांतील मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहिले. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते, मात्र त्यापैकी अनेकांनी पक्ष सोडल्याने उद्धव ठाकरे गटाकडे केवळ 36 माजी नगरसेवक उरले होते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण मानली जात होती. तरीही, ज्या भागांतून नगरसेवकांनी साथ सोडली होती, तिथे नवी फळी उभारत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या. त्यात मनसेच्या सहा जागांची भर पडल्याने एकूण आकडा 71 वर पोहोचला.
2017 मधील 84 जागांच्या तुलनेत हा निकाल फारसा कमी नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जर ठाकरे बंधूंनी आणखी लवकर युतीची घोषणा केली असती आणि मुंबईत अधिक संयुक्त सभा घेतल्या असत्या, तर हा आकडा आणखी वाढू शकला असता, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा संयुक्त कार्यक्रम पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule