
नांदेड, 20 जानेवारी (हिं.स.)नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या आदेशावरुन त्यांच्या पथकाने नांदेड व हिंगोली जिल्ह्यात केलेल्या कारवाईत आखाडा बाळापूर येथे १४ लाख ६७ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा तर नांदेड शहरात ५८ लाख २६ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा व वाहने असे दोन्ही जिल्ह्यात एकूण १ कोटी ३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशावरून पथकाचे सहाय्यक एक पोलीस निरीक्षक तलेदवार व ५ अंमलदारांचा समावेश असलेल्या सदर पथकाने, प्रथमत हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथे कारवाई करत, तीन चारचाकी वाहनांमधून १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला
नांदेड शहरातील इतवारा भागात गुटखा साठवलेल्या एका गोडाऊनवर कारवाई करून एकूण ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा व माल पुरवणारा २० लक्ष ५० हजार रुपयाचा एक ट्रक असा एकूण ७८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
सदर कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना १५ हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर कळवावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis