
लातूर, 20 जानेवारी (हिं.स.)।
२० वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस लातूर पोलिसांच्या विशेष पथका कडून अटक.
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावणे तसेच न्यायप्रक्रियेला गती देणे या उद्देशाने लातूर पोलीस दल सातत्याने प्रभावी आणि काटेकोर कार्यवाही करीत आहे. याच धर्तीवर लातूर पोलीस यांचे विशेष पथकाने तब्बल २० वर्षांपूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस शोधून काढत त्याला अटक करून मोठे यश संपादन केले आहे.
तसेच पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर गुन्हा रजिस्टर नं. 126/2006, कलम 379 भा.दं.वि. अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी गेली दोन दशके प्रशासनास गुंगारा देत होता. आरोपी सतत आपले वास्तव्य बदलत असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता व त्यामुळे सदर प्रकरण सुप्त संचिकेत (Dormant File) ठेवण्यात आले होते. मात्र, “कायद्याच्या हातात उशीर होऊ शकतो, पण तो न्याय देण्यात कधीच कमी पडत नाही” या तत्वावर लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा सुरू केला.
दि. 19/01/2026 रोजी अपर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी बाबु लक्ष्मण संकोळे, वय 41 वर्षे, रा. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर (सध्या वास्तव्यास : याकतपूर रोड, औसा) हा कमालपूर–उजनी शिवारात उसतोडीचे काम करीत आहे. सदर माहितीची खातरजमा करून ती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर योग्य नियोजन करून विशेष पथकाने कमालपूर–उजनी भागात सापळा रचत आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे हजर करण्यात आले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी अरविंद विठ्ठलराव भोसले, रा. शाहूपुरी कॉलनी, लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 10/07/2006 रोजी रात्री सुमारे 10.00 वाजता त्यांच्या घरासमोर उभी केलेल्या अम्बेसेडर कार क्र. MEQ-1561 मधून पॉईनर कंपनीचा सुमारे 4,000/- रुपये किंमतीचा कार टेप अज्ञात चोरट्याने चोरी केला होता. यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गु.र.नं. 126/2006, कलम 379 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीस दि. 14/07/2006 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तो न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहू लागला. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले व अखेर सदर केस सुप्त संचिकेत ठेवण्यात आली. आरोपी गेली २० वर्षे सतत आपले वास्तव्य बदलून कायद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होता. आज रोजी आरोपीस मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता, मा. मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. सतिश एन. पाटील यांनी त्यास दि. 27/01/2026 पावेतो न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कार्यवाही लातूर पोलीस दलाच्या प्रामाणिक, चिकाटीपूर्ण व जबाबदार कामकाजाचे उत्तम उदाहरण आहे. कितीही जुना गुन्हा असला तरी आरोपीला शोधून काढून त्यास न्यायालयासमोर उभे करण्याचा लातूर पोलिसांचा निर्धार यातून अधोरेखित होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis