जळगाव : कर्ज देण्याच्या आमिषाने नागरिकांची ३.४५ लाखांनी फसवणूक
जळगाव, 20 जानेवारी (हिं.स.) फायनान्स कंपनीतून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगत पाचोरा शहरातील काही नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संभाजीनगर येथील एका महिलेविरुद्ध तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पा
जळगाव : कर्ज देण्याच्या आमिषाने नागरिकांची ३.४५ लाखांनी फसवणूक


जळगाव, 20 जानेवारी (हिं.स.) फायनान्स कंपनीतून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगत पाचोरा शहरातील काही नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संभाजीनगर येथील एका महिलेविरुद्ध तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णापुरी भागात राहणाऱ्या सुनंदाबाई सुभाष पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आरती गजानन चंदनशे (रा. संभाजीनगर) हिने आपण एल.एन.टी. फायनान्स कंपनीत काम करत असल्याचे भासवले. कर्ज काढून देण्यासाठी काही प्रक्रिया शुल्क लागते, असे सांगून तिने वेगवेगळ्या व्यक्तींकडून रोख तसेच ऑनलाइन स्वरूपात पैसे घेतले. २ ऑक्टोबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरोपी महिलेने सुनंदाबाई पाटील आणि त्यांच्या मुलाकडून एकूण १ लाख ४० हजार रुपये घेतले. याशिवाय शेजारी राहणाऱ्या माधुरी खैरनार यांच्याकडून ५६ हजार, योगिता निंबा महाजन यांच्याकडून ७५ हजार, तर उज्वला धनंजय पाटील यांच्याकडून ७० हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही कुणालाही कर्ज मिळाले नाही.या प्रकारात एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, सुनंदाबाई पाटील यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी आरती चंदनशे हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande