
परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)।
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील ८५ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. या निर्णयाला दोन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप पर्यंत फरकाची रक्कम सरकारकडून महामंडळाला देण्यात आली नसून घोषणेची पूर्तता करण्यासाठी व सरकारची अब्रू वाचविण्यासाठी एसटीच्या तिजोरीतून सदरच्या रक्कमेचे वाटप गेले दोन महिने करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आदेश राज्याचा अर्थ खात्याकडून डावलण्यात येत असून परिणामी महामंडळावर आर्थिक बोजा वाढत असल्याने महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
श्रीरंग बरगे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त आले असताना काँग्रेस भवन, शनिवार बाजार येथे झालेल्या परभणी विभागातील एसटी कर्मचारी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम अदा करण्यासाठी महामंडळाला राज्य सरकार कडून दर महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत झालेल्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या एसटी मधील सर्व श्रमिक संघटनाच्या बैठकीत कबूल करण्यात आले होते. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व महामंडळ आर्थिक कचाट्यात येऊ नये याची खबरदारी म्हणून अर्थ सचिव ओमप्रकाश गुप्ता यांना सदर बैठकीस खास निरोप देऊन बोलाविण्यात आले होते व त्यांना विश्वासात घेऊनच सदरचा निर्णय घेण्यात आला होता. तरीही उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्या या सामुहिक निर्णयाची अंमलबजावणी अद्यापि अर्थ विभागाकडून करण्यात आली नसून सरकारची अब्रू राखण्यासाठी महामंडळाने आपल्या तिजोरीतून ही रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना वाटप केली आहे .महामंडळाच्या तिजोरीत अगोदरच खडखडाट असताना एसटीने आपल्या तिजोरीतून सदरच्या रक्कमेचे वाटप केले असल्याने महामंडळाला पीएफ ग्रॅज्युटी, बँक या संस्थांची कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली रक्कम त्या त्या संस्थांकडे भरण्यात अडचणी निर्माण झाल्या असून संबंधित संस्था व महामंडळासमोरील इतर देणी मिळून आज रोजी ४१५१.४९ कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित असून परिस्थिती सुधारली नाही तर संबंधित संस्था अडचणीच्या खाईत जाऊ शकतात.शासनाच्या अर्थ विभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिल जात नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या व महामंडळा समोरील आर्थिक समस्या जैसे थे आहेत असेही बरगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याकाठी ४७४ कोटी ८४ लाख रुपये इतकी रक्कम लागत होती त्यातच वाढीव वेतनाच्या फरकासाठी दर महिन्याला अजून साधारण ५८.३० कोटी रुपये इतकी रक्कम लागत असून ती गेले दोन महिने कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.राज्य सरकार कडून दरमहा येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून सद्या वेतन देण्यात येत असून सरकार ही रक्कम कधीच पूर्णपणे देत नसल्याने महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले असून
राज्य सरकारच्या अर्थ खात्याला विश्वासात घेऊनच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चांगल्या भावनेतून व कर्मचाऱ्यांना मदत व्हावी याहेतूने घेतलेल्या निर्णयांना अर्थ खाते गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या बाबतीत तसेच जानेवारी २०२५ वाढलेला महागाई भत्ता मिळावा यासाठी पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली जाणार असून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. या मेळाव्याला संघटनेचे उपाध्यक्ष वसंत बोराडे, विभागीय अध्यक्ष माऊली मुंडे, विभागीय सचिव संतोष भराड, देवीदास जटाळे, संदीप बोराडे, डी . जे. भिसे, प्रवीण खांडेकर, जावेद पठाण, गजेंद्र देशमुख, महारुद्र घबाडे परभणीचे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी इतर संघटना मधील ७३ कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेत प्रवेश केला...
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis