
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)।
अमरावती शहराच्या महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकारणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच, महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट प्रभागातील एक अविश्वसनीय आणि राजकीय अर्थाने धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रभागात मतदार बदलले नाहीत, मतदानाचा आकडा बदलला नाही, विजयी मतसंख्याही बदलली नाही, बदलला फक्त उमेदवार ! प्रभाग क्रमांक ५ महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट येथे २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर संजय वानरे विजयी झाले होते. त्या वेळी त्यांना ३,७४२ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांची उमेदवारी पक्की म्हणून प्रभागात अॅक्टीव राहण्यासाठी सांगितले, दूसरीकडे मात्र दबाव तंत्र वापरत निकटवर्तीय मानले जाणाऱ्यांना उमेदवारी दिली. परिणामी तिकीट नाकारल्याने संजय वानरे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली; मात्र यावेळी त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळू शकला नाही.दरम्यान, भाजपकडून यंदा मैदानात उतरलेल्या सुनीता लोणारे यांनी ही निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे, सुनीता लोणारे यांनाही अगदी ३,७४२ मतेच मिळाली, जी २०१७ मध्ये संजय वानरे यांना मिळालेल्या मतांइतकीच आहेत! एकही मत कमी जास्त झालेले नाही.
एकाच प्रभागात, दोन वेगवेगळ्या निवडणुका दोन वेगवेगळे उमेदवार, मात्र विजयी मतसंख्या समसमान हा निव्वळ योगायोग की 'उमेदवार नव्हे, पक्षच महत्त्वाचा' हे मतदारांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे?या निकालामुळे शहराच्या राजकारणात ब्रँड भाजपा विरुद्ध चेहरा ही चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. तिकीट नाकारताच उमेदवाराची मते घसरतात आणि तिकीट मिळताच नवा चेहरा त्याच मतसंख्येवर विजयी ठरतो. यावरून संघटनात्मक ताकद, बूथ मॅनेजमेंट आणि पक्षनिष्ठ मतदारांची भूमिका निर्णायक ठरते असल्याचे स्पष्ट होत आहे. महेंद्र कॉलनीतील हा निकाल आता केवळ आकड्यांचा खेळ राहिलेला नसून, भविष्यातील महापालिका राजकारणाची दिशा ठरवणारा संकेत मानला जात आहे. मतदार उमेदवार पाहतो की पक्ष ? या प्रश्नाचे उत्तर या प्रभागाने आकड्यांतूनच दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी