
छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथील बाजारात
हिरव्या वाटाण्यासह पालेभाज्यांचा दिलासा कायम असून, बहुतेक फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र शेवगा, गवार, तोंडली अशा काही भाज्यांची तेजी कायम आहे. तर, आवक कमी झाल्याने दोडकेही काहीअंशी वधारल्याचे पाहायला मिळत आहे.
हिरव्या वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे आणि मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून ही आवक वाढत गेली असली तरी पुढच्या काही आठवड्यांपासून आवक कमी होण्याची शक्यता आहे. साहजिकच आजचा ४० ते ५० रुपये किलोचा भाव फेब्रुवारीत वाढू शकतो, अशीही
शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात, सध्या तरी दिवस हिरव्या वाटाण्याचे आहेत आणि सध्याचा वाटाणा चांगलाच कोवळा येत आहे. त्याचप्रमाणे गाजर, काकडी, बीट, मुळाही मोठ्या प्रमाणावर बाजारात दिसून येत आहे.
पालेभाज्यांची स्वस्ताई कायम आहे आणि बहुतेक पालेभाज्यांची जुडी १० रुपयांनी, तर दोन जुड्या १५ रुपयांनी विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे सर्वांच्या आवडीची लालकोराची गावरान मेथी सध्या बाजारात मुबलक प्रमाणात व उत्तम दर्जाही येत आहे. इतरही पालेभाज्या विस्तृत प्रमाणात उपलब्ध आहेत.
काकडी मात्र अजूनही ६० रुपये किलोच्या घरात आहे आणि बीट-मुळा प्रत्येकी १० रुपये नगाने मिळत आहे. त्याशिवाय सध्या बाजारात उत्तम प्रतीचा लाल भोपळाही पाहायला मिळत आहे व आवक बऱ्यापैकी जास्त असल्याने
भाव २५० ग्रॅममागे २० रुपयांवर आला आहे. दुधी भोपळाही नेहमीप्रमाणे २० रुपये पाव किलोने विकला जात आहे. त्याचप्रमाणे अनेक फळभाज्या २५० ग्रॅममागे २० रुपयांच्या घरात आहेत आणि यात भेंडी, डिंगऱ्या, कारले, लिंबू, पत्ताकोबी, हिरवे टोमॅटो, चवळी, वाल, गिलके आदींचा यात समावेश होते. तर, सिमला मिरची, फुलकोबी, श्रावण घेवडा, मोठी मिरची, ब्रोकोली, आले (अद्रक) आदींची २५० ग्रॅममागे ३० रुपयांनी विक्री होत आहे. लाल टोमॅटोचा भाव कमी नसून, मागच्या काही दिवसांपासून ६० रुपये किलोपर्यंत भाव पोहोचलेला आहे. तसेच तोंडल्यांचा भाव मात्र काही दिवसांपासून २५० ग्रॅममागे ४० रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे. लसूण मागच्या काही महिन्यांपासून २५० ग्रॅममागे ६० ते ८० रुपयांवर स्थिर आहे. कांदे-बटाटेही प्रत्येकी ४० रुपये किलोवर स्थिर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis