
परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)।
मनुष्याने निरंतर आनन्यभावे परमेश्वराला शरण जावे आणि त्याद्वारे मोक्षप्राप्ती मिळवावी, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार, संतसाहित्याचे अभ्यासक आणि भगवद्गीतेचे उपासक परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवद्गीतेवरील प्रवचन येथील पार्वती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.
भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायावर ‘अक्षर ब्रह्म योग’ या विषयावर ते बोलत होते.
भगवद्गीतेतील प्रत्येक अध्याय दरवर्षी क्रमाने मांडण्याची परंपरा चैतन्य महाराजांनी यावर्षीही आपल्या निरुपणातून जपली. भगवतगीतेच्या आठव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अदिभूत, अधिदैव आणि आदियज्ञ या संकल्पनांचे अर्थासहित स्पष्टीकरण दिले आहे. या तत्त्वांवर चैतन्य महाराजांनी सोप्या भाषेत आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर प्रकाश टाकला. साधकांना शाश्वत सत्याकडे जायचे असल्यास जन्म आणि मृत्यूच्या व्यवहारीक चक्रातून कसे मुक्त व्हायचे हे मार्गदर्शन करणारा हा अध्याय आहे, असे नमूद केले. प्रवचनादरम्यान गीतेसह ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम महाराजांच्या अभंगांचे संदर्भ देवून अवघड तत्त्वज्ञान सहज समजेल अशा पद्धतीने उलगडले. मडक्याच्या निर्मितीमध्ये माती हे उपादान असून, कुंभाराची बुद्धी केवळ निमित्तमात्र असते, अशा उदाहरणांतून ब्रह्म आणि सृष्टीचे नाते त्यांनी स्पष्ट केले.
अदिभूत, अधिदैव आणि आदियज्ञ यांच्या व्याख्येचे प्रमाण त्यांनी उपनिषद, वेद, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथातील प्रमाणाद्वारे सांगितले. अक्षरब्रम्ह योग नावाने ओळखला जाणारा हा अध्याय अक्षर म्हणजे न मिटणारे याबाबतचे विवेचन केले. निर्मितीमय आणि विसर्ग या सगळ्या बाबी जडत्वाशी संबंधित आहेत. ब्रम्ह हा सर्वव्यापक असून त्याला सुरुवातही नाही आणि त्याला विसर्गही नाही, असे नमूद केले. मृत्यूच्या वेळेस हरिनाम मुखामध्ये यावे त्यामुळे मोक्ष मिळते. त्यासाठी हरिनामाची सवय मनुष्याने लावू घ्यावी, असे ते म्हणाले. मनुष्याने निरंतर आनन्यभावे परमेश्वराला शरण जावे आणि त्याद्वारे मोक्षप्राप्ती मिळवावी, असे ते म्हणाले.
यावेळी चैतन्य प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. त्रिंबकराव सुगावकर, स्व. कुसुमताई सुगावकर, स्व. सुलभाताई देऊळकर तसेच श्री व सौ. पांडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदराव देशमुख कोठेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्राम परळीकर, मयांक परळीकर, पंकज लाठकर आणि कृष्णराज लव्हेकर यांच्या गायनसेवेने वातावरण भक्तिमय झाले. समारोप प्रसंगी सौ. नलिनीताई बीडकर, सौ. वीणा मांडाखळीकर, सुश्री सुचिताताई काशीकर आणि कविता कुलकर्णी यांनी पसायदान सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री वि. म. औंढेकर, सुहासराव बीडकर, विजयराव उर्फ बंडूनाना सराफ, प्रभाकरराव देशमुख, शिवाजीराव वांगे, रमाकांत लिंबेकर, नंदकुमार कौसडीकर, आबा टाकळकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
पुढील वर्षी 4, 5 व 6 फेब्रुवारी 2027 रोजी भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायावर चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis