
अमरावती, 03 जानेवारी (हिं.स.)।
महानगर पालिका निवडणुकीचे चित्र शुक्रवार २ रोजी रात्री उशिरा स्पष्ट झाले. मनपाच्या ७ही निवडणूक केंद्रांवर एकूण १६१ उमेदवारांनी माघार घेतली. यापैकी बहुतेक हे अपक्ष आहेत. आता एकूण ६६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ८२२ उमेदवारांनी ९०६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ अर्ज अवैध ठरले होते. कोणत्याही प्रस्थापित उमेदवाराने अर्ज परत घेतला नाही. बहुतेक पक्षाने घोषित केलेल्या यादीतील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम असून आता शनिवार ३ रोजी चिन्ह वाटप झाले की, रविवारपासून मनपा निवडणुकीला खरी रंगत चढणार आहे. काहींनी आधीपासूनच प्रचार सुरू केला असला तरी प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल.
दिलेल्या शब्दांनुसार कोणत्याही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची माघार घेतली नाही. मात्र, काही बंडखोरांनी माघार घेतली आहे. भाजपने युवा स्वाभिमान पार्टीसाठी ८ जागा सोडल्या होत्या. त्याचवेळी भाजपा शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी शुक्रवारी एक पत्र प्रभाग क्र.११ फ्रेजरपुरा-रुक्मिणीन गर ब मधील शैलेश राऊत यांच्या ऐक्जी वायएसपीचे उमेदवार सूरज चौधरी, प्रभाग क्र. २१ क जुनी वस्ती बडनेरा येथील भाजपचे गौरव बांते यांच्या ऐवजी वायएसपीचे किरण अंबाडकर आणि प्रभाग क्र. १७ गडगडेश्वर क मधील भाजपाच्या मृणाल चौधरी यांच्या ऐवजी वायएसपीच्या प्रियंका पाटणे यांना भारतीय जनता पार्टीकडून बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र काढले. हे पत्र व्हायरल झाले आहे. मात्र, या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली की, नाही याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी